धारावीत तणाव; मशीद पाडकामाला स्थगिती

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये आज तणावाचे वातावरण आहे. धारावीत ९० फुटी रस्त्यावर २५ वर्षे जुनी असणाऱ्या सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाडला आहे. त्यामुळे धारावीतील नागरिक सकाळपासून रस्त्यावर उतरले आहेत. अखेर खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीत येऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतल्या सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत अजूनही तणाव आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मशिदीचा अनधिकृत भाग पाडल्यामुळे तेथील संतप्त रहिवाशांनी महापालिकेच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. याचदरम्यान, धारावी कार्यक्षेत्र असलेल्या तथा उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड या घटनास्थळी दाखल झाल्या. वर्षा गायकवाड यांनी या भागात ठिय्या मांडत नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मशिदीच्या पाडकामाला देखील स्थगिती देण्यात आली आहे. सध्या सहा दिवसांसाठी या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
धारावीत पोलिसांचा फौजफाटा
धारावीतील तणावाची परिस्थिती लक्षात घेता, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त धारावीमध्ये दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मशिदीचे ट्रस्टी आणि वर्षा गायकवाड यांची पोलिसांसोबत बैठक झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.