सुप्रिया सुळेंचा मोबाईल झाला हॅक!

फक्त मुद्द्याचं न्यूजनेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आहे. सोशल मीडियावरून सुप्रिया सुळे यांनी रविवारी दुपारी ही माहिती दिली आहे. मला कोणीही फोन किंवा मेसेज करू नका, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मोबाईल हॅक होणे, फेसबुक अकाउंड हॅक होणे, व्हॉट्सअप बंद होणे हे प्रकार अलिकडे सर्रास अनुभवास येतात. सामान्य माणसांबरोबर अगदी उद्योगजक, सिनेतारका, खेळाडू यांच्याबाबतीत झाल्याचे आपण पाहिले आहेच. आता हा हॅकिंगचा व्हायरस राजकारण्यांच्या मोबाईलमध्येही शिरला आहे. सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्यापासून आता राजकारण्यांनाही याची धास्ती बसली आहे.
हॅक झाल्याचं लक्षात कसं आलं?
या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, मी स्वतः फोन वापरत नसताना माझ्या फोन वरून इतरांना मेसेज पाठवले जात होते. माझ्या बरोबरीने माझा फोन दुसरंही कोणीतरी हाताळत आहे, हे लक्षात आल्यानंतर मी फोन बंद करून सिमकार्ड काढले. सोबत असलेल्या जयंत पाटील यांना माझ्या नंबरवर मेसेज करायला सांगितला. त्यांनी मला नमस्कार असा मेसेज केल्यानंतर, माझ्या क्रमांकावरून त्यांनाही नमस्कार असा रिप्लाय दिला गेले. पण माझ्या हँडसेट माझ्याकडे बंद करून ठेवलेला होता. तेव्हाच हॅक झाल्याचे लक्षात आले.