कुंभमेळ्यातील स्वच्छतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
महाकुंभनगर (उत्तरप्रदेश – वृत्तसंस्था) : महाकुंभ मेळ्यामध्ये येऊन नदीपात्रात पवित्र स्नान करण्यास सुरक्षित आहे, याचा दाखला देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीच्या पाण्याची दैनंदिन नमुना चाचणी, फुले आणि पूजा साहित्य नदीपात्रातील पाण्यातून काढून टाकणे, सांडपाणी व्यवस्थांपर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी २०० किलोमीटरची तात्पुरती ड्रेनेज व्यवस्था आणि मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यावरून येथील पवित्र स्नान हे सुरक्षित असल्याची पावती देण्यात येत आहे.
हिंदु धर्मियांमध्ये पवित्र मानला जाणारा महाकुंभ मेळा हा दर १२ वर्षांनी भरविला जातो. प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून या मेळ्याला प्रारंभ झाला आहे. तो ४५ दिवस सुरू राहणार आहे. आठ कोटींपेक्षा अधिक भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी येथे दाखल झाले आहेत.
येत्या २९ जानेवारी रोजी असणाऱ्या मौनी अमावस्या या प्रमुख स्नानाच्या दिवशी सुमारे ५० लाख भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतील, असा येथील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दररोज सुमारे १६ दशलक्ष गाळ आणि सुमारे २४० दशलक्ष लीटर सांडपाणी निर्माण होऊ शकतो. यासगळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान मदतीसाठी सज्ज आहे. जीपीएस, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि स्ट्रिमिंगचा वापर याठिकाणी करण्यात आला आहे.