बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची बिनविरोध निवड!

जम्मू काश्मीरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा प्रथमच मान
मुंबई भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची बीसीसीआय वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडली. या सभेत माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मन्हास यांच्या निवडीमुळे जम्मू काश्मीर क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.

बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सदस्य असलेल्या मिथुन मन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे .सौरव गांगुली. रॉजर बिन्नी या बीसीसीआयच्या मागील दोन अध्यक्षाप्रमाणेच मिथुन मन्हास यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि भारताचे माजी फिरकीपटू रघुराम भट्ट यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली .त्याचप्रमाणे देवजीच सैकिया हे सचिव पदी कायम राहिले आहेत. प्रभुतेज भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली.
मिथुन मन्हास यांचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला असला तरी त्यांनी दिल्ली संघासाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले. ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखले जात आणि आवश्यकतेनुसार ऑफ स्पिन गोलंदाजी करून विकेटही घेत. त्यांनी 1997- 98 च्या हंगामात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले . मिथुन मन्हास यांनी फर्स्ट क्लास 157 सामन्यात 9714 धावा केल्या आहेत . ज्यामध्ये 27 शतके आहेत . दिल्ली रणजी संघाचे कर्णधार म्हणून अनेक वर्ष संघाचे नेतृत्व त्यांनी केले मात्र भारतीय संघात त्यांना संधी मिळाली नाही.

