चऱ्होलीतील व्यावसायिकाच्या खात्यातील पाच लाख रुपयांचा गैरवापर!

पिंपरी : महिलेच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये तिच्याच मैत्रिणीने वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आणि ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी धन्वंतरी क्लिनिक, काळेवस्ती, चऱ्होली येथे घडली. महिलेने कंपनीचा आयडी वापरून तिच्या मैत्रिणीच्या नावे परस्पर खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ४२ वर्षांची असून, ती मांजरी, पुणे येथील रहिवासी आहे. त्यानुसार दोन महिला आणि अभिजीत राजन कानगुडे (रा. तनिष ऑर्चिड, चऱ्होली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने व्यवसायाबाबत चर्चा करण्यासाठी दुसऱ्या महिलेला तिचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिले होते. त्या महिलेने माहितीचा उपयोग करून कोणताही करार केला नाही आणि करार करण्यास टाळाटाळ केली. तसेच व पीडित महिलेकडून व्यवसायासाठी ७ आणि ८ जानेवारी रोजी पाच लाख रुपये घेतले आणि वैयक्तिक कामासाठी वापरले. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी १० जानेवारी २०२५ रोजी क्यूनेट कंपनीसोबत केलेल्या खरेदीचा संबंध ७ आणि ८ जानेवारी रोजीच्या व्यवहाराशी जोडला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

गोवंश तस्करी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल!
पिंपरी : कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश कदम यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद गजानन जाधव (वय ३६, रहाटणी) आणि बाळा पवार (चांदखेड, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिसांना पोलिस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली की, एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असून त्यांना कत्तलखान्यात नेले जात आहे. त्यानुसार रावेत पोलिसांनी कारवाई करत एक टेम्पो पकडला. त्यातून ३० हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायींची सुटका केली. रावेत पोलिस तपास करत आहेत.