सेंट्रल व्हेईकल वर्कशॅाप कर्मचारी पतसंस्थेत पाच कोटींचा गैरव्यवहार!

व्यवस्थापकासह पाच जणांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी: चिंचवड येथील सेंट्रल व्हेईकल वर्कशाॅप कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये ठेवीदारांच्या रकमेतील तब्बल चार कोटी ९० लाख ७८ हजार १४० रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पतपेढीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर हनुमंत केदारी (वय ५४, चिंचवड), डी. एस. चौगुले (दळवीनगर, चिंचवड), व्ही. एल. खांडेभराड (मेदनकरवाडी, चाकण), डी. डी. नलावडे (नंदनवन सोसायटी, चिंचवड) आणि एन. के. दुर्गे (नांगरगाव, लोणावळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेंद्र सिताराम कांबळे (वय ५५, पाषाण-सुस रोड, पुणे) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर केदारी हे पतपेढीचे व्यवस्थापक असताना २००७ ते २०२५ या कालावधीत ठेवीदारांकडून घेतलेली ३ कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कम परत न करता ती स्वतःच्या व पत्नीच्या नावावर वळवली. या अपहारामध्ये पतपेढीचे माजी अध्यक्ष डी. एस. चौगुले, व्ही. एल. खांडेभराड, डी. डी. नलावडे आणि एन. के. दुर्गे यांनी आरोपीस आर्थिक व्यवहारात मदत केली. आरोपींनी आपसांत संगनमत करून एकूण ४ कोटी ९० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा चिंचवड पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

सौर प्रकल्पाच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक!
पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून सौर हायमास्ट आणि स्ट्रीटलाईट साहित्य पुरविण्याच्या नावाखाली दीड कोटी रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना १२ ऑक्टोबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.
श्रवणकुमार भगवानाराम बिष्णोई (वय २२, शिरूर, मूळ रा. बारमेर, राजस्थान), सुरेश बिष्णोई बेनिवाल (वय २५, शिरूर, मूळ रा. बालोत्रा, राजस्थान) आणि भागीरावराम बिष्णोई (वय ३६, उरुळी देवाची, मूळ रा. जालोर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अजितकुमार जलेश्वर प्रसादसिंह (वय ३५, मोशी) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कामधेनू एंटरप्रायझेस या नावाने खाते उघडून ग्रामपंचायतीच्या सौर प्रकल्पासाठी लागणारे साहित्य देण्याचे सांगितले. मात्र साहित्य न देता १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतली. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

