अल्पवयीन मुलाला टोळक्याकडून मारहाण!

पिंपरी : किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाला चार जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलु येथील पडवळ वस्ती परिसरात घडली.

महाळुंगे एमआयडीसी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम गोडसे (रा. वासुली फाटा, ता. खेड, जि. पुणे), शुभम गाडे, शुभम शिवले आणि विशाल शेळके (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत अल्पवयीन मुलाने शनिवारी (दि. २५) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा मावसभाऊ दीपक व वैभव लिंभोरे यांच्या आयशर गाडीच्या भाड्याच्या कारणावरून शुभम गोडसे याच्याशी वाद झाला होता. त्यावेळी आरोपी गोडसे याने वैभव यास शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता शुभम गाडे याने फिर्यादीच्या कपाळावर लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर शुभम शिवले याने फिर्यादीला उचलून आपटले. शुभम गोडसे आणि विशाल शेळके यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.
डंपरची दुचाकीला धडक; दाम्पत्य जखमी
पिंपरी : भरधाव वेगातील डंपरने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. २५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील चिंबळी सिग्नलजवळ घडली.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम तुळशीराम गवळे (रा. कटकेवाडी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. विलास सखाराम भोसले (वय ५९, रा. नवले रेसिडन्सी, पिंपळे सौदागर) असे जखमीचे नाव असून त्यांनी शनिवारी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांची पत्नी मालती भोसले हे स्कुटीवरून प्रवास करत होते. त्यावेळी गवळेच्या ताब्यातील डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली. अपघातात मालती भोसले गंभीर जखमी झाल्या असून त्यांना एकूण ४१ टाके पडले.

