काळेवाडीत गादी कारखान्याला आग; दोन जखमी

पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर येथील एका कारखान्याला आज (३ जून) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ ते १० बंबांनी अवघ्या दीड तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत दोन जखमी, दोन्ही कारखाने मिळून आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कारखान्यात कपडे, गादी, कागद असा माल जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
काळेवाडी येथील विजयनगर परिसरातील कारखान्याला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. ही आग विजयनगर परिसरात एकाच पत्र्याच्या शेडमध्ये दोन कारखाने आणि एक गोदामास लागली होती. गोदामात कपडे, गाद्या आणि कागदी साहित्य होते. या शेडला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आगीने पेट घेतला आणि धुराचे लोळ दिसू लागले. त्यानंतर किनारा कॉलनी आणि शेजारील अरुंद रस्त्याने अग्निशमन दलाचे जवान आत गेले.
याठिकाणी एमआयडीसी, पुणे शहरातून गाड्या मागवल्या होत्या. साधारणपणे दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. आगीच्या रूद्र रूपामुळे धुराचे लोळ आणि येथील वातावरण भीतीदायक झाले होते. आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिक घाबरून इमारतीच्या खाली आले होते.
दुर्घटनेसंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की, शहरातील गोदामांचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच निवासी जागेत कारखाना कसा काय यासाठी सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येईल. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून योग्य ती खबरदारी पुढील काळात घेतली जाईल.

सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काळेवाडीकडून विजयनगरकडे जाणारा रस्ता बंद केला होता. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिस यांच्या गाड्यांव्यतिरिक्त कोणतीच गाडी सोडण्यात येत नव्हती. आग लागलेला कारखाना सोसायटीच्या शेजारून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळ गाठण्यासाठी वेळ लागला. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आणली गेली. या परिसरात एकच शेडमध्ये दोन कारखाने व गोदाम चालवले जात होते. गोदामात कपडे आणि गादीचे साहित्य होते. तर एका कारखान्यात कागदी, वापरा आणि टाका अशा प्लेट बनवल्या जात होत्या. एकाच शेडमध्ये दोन व्यवसाय बांधण्यात आलेल्या एकाच शेडमध्ये कारखाना आणि गोदाम असे दोन व्यवसाय सुरू होते. कागदी प्लेट बनवण्याचा कारखाना तर कापड आणि गादीचे गोदाम या ठिकाणी होते. त्यामुळे आगीत दोनही व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे.