चर्होलीत पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!

चांगली दिसत नाहीस म्हणत केला छळ
पिंपरी : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चर्होली येथे पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नी दिसायला चांगली नाही, असे सतत हिणवत तसेच तिचे दागिने गहाण ठेवत पतीने तिचा मानसिक छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही घटना ३ जून रोजी
दुपारी चर्होली येथे घडली.

सुजाता नरसिंग माने (वय ३२, रा. तनिष पर्ल, चर्होली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुजाता यांचे वडील शिवाजी संपतराव सूर्यवंशी (वय ५६, रा. थेरगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. पती नरसिंग वामनराव माने (वय ३३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता आणि आरोपी नरसिंग यांचा २५ जून २०१९ रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर नरसिंग याने सुजाता दिसायला चांगल्या नाहीत, असे म्हणून सतत हिणवत त्यांचा मानसिक छळ केला.
वेळोवेळी भांडण करून शिवीगाळ व दमदाटी केली. माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. फ्लॅटसाठी तसेच आर्थिक अडचणी असल्याचे सांगून सुजाता यांचे दागिने नरसिंग याने गहाण ठेवले. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. अखेर या छळाला कंटाळून सुजाता यांनी ३ जून रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे तपास करीत आहेत.