मराठी भाषा संस्कृती जोपासणारी ज्ञानभाषा :आमदार अमित गोरखे

या भाषेला व्यावहारिक भाषेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी
पिंपरी : आजचा काळ आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. यात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असून मराठी भाषा संस्कृती जोपासणारी ज्ञानभाषा आहे. या भाषेला व्यावहारिक भाषेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास युवा शक्तीला रोजगाराच्या अनेक संधीचे दालन खुले होऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मराठी भाषेची संस्कृती जागवणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी अमित गोरखे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेसाठी दिलेले योगदान महत्वपुर्ण आहे. अनेक साहित्यिक लेखकांनी मराठी भाषेचा दर्जा उंचावला. त्यातून महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यात यशस्वी होऊन देशात अग्रभागी राहिला आहे. शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन संधीचे दार खुले करून दिले आहे. शासकीय कार्यालयात मराठीचा वापर केला जात आहे. या भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महापालिकेने सातत्याने पुढाकार घ्यायला हवा.
याप्रसंगी माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडीचे प्राचार्य ज्योत सोनवणे, मराठी भाषा समन्वय अधिकारी तथा विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यालयीन अधिक्षक उमा दरवेश तसेच मोरवाडी आणि कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे गटनिदेशक, शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीने काम करीत आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरूवात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या महाराष्ट्र दर्शन या गायनाच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात शिक्षकांनी कानडा राजा पंढरीचा.., जीवा शिवाची बैल जोड.., मी हाय कोळी.., अशी मालवणी, खान्देशी, वऱ्हाडी, कोकणी भाषेवर आधारित गीते सादर केली.
यानंतर सुलेखनकार शरद कुंजीर यांनी आपल्या शब्दांना भाव देणाऱ्या कलेने म्हणजेच सुलेखनाने सर्वांना मोहून टाकले. त्यांनी यावेळी आपल्या कुंचल्यांच्या सहाय्याने कवी कुसुमाग्रज यांचे अतिशय सुंदर असे चित्र रेखाटले. तसेच मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या शब्दांच्या रचना देखील कागदावर उतरवल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी या कलेच्या प्रात्याक्षिकामध्ये सहभाग घेतला.व्याख्याते डॉ. शिवप्रसाद महाले यांनी युवा शक्तीची स्वर्णिम भारताकडे वाटचाल या विषयावरील आपल्या प्रेरणादायी व्याख्यानाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, भारत देशातील युवांमध्ये खुप शक्ती आहे. अनेकांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर आज जगाच्या पाठीवर एक वेगळा ठसा उमटविला आहे. पण आज या देशातील बरीचशी पिढी सोशल मिडीयाच्या जाळ्यात अडकली आहे.तुम्ही कोणत्या सानिध्यात राहता हे खुप महत्वाचे आहे.
त्यानंतर राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यांच्या भारूडाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी त्यांनी आपल्या पारंपारिक लोककलेच्या अविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांनी यावेळी संत सेना महाराज यांचे वारिक वारिक वारिक करू हजामत बारीक, संत एकनाथ महाराज यांचे नवरा नको गं बाई, मला दादला नको बाई तसेच गुरगूंडा होईल बया गं… अशा विविध विषयांवर भारूडे सादर करून प्रबोधन केले.
यावेळी ज्ञानेश्वरी ढगे या बालकिर्तनकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास सांगणारे प्रवचन सादर केले. तसेच प्रतिज्ञा रूमडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार औद्योगिक प्रशिक्षण मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मानले. तसेच सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि पौर्णिमा भोर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कासारवाडी तसेच मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक प्रकाश घोडके, शर्मिला कारावळे, मनोज ढेरंगे, किसन खरात, कार्यालयीन अधिक्षक उमा दरवेश, मुख्य लिपीक विजय भैलुमे, प्रविण शेलार, मयुरी वाडेकर यांचे सहकार्य लाभले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मराठी शाळेमुळे मिळाली संधी
आमदार अमित गोरखे यांनी याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेमुळे स्वतःची कशी जडणघडण झाली, यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मराठी माध्यम शाळेत माझे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. या शाळेतील शिक्षकांनी माझा मराठी भाषेचा पाया पक्का करून घेतला. येथेच माझी भाषण करण्याची कला विकसित झाली. येथे मिळालेल्या ज्ञानाचा मला साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अध्यक्ष म्हणून काम करताना तसेच सध्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम करताना खूप उपयोग झाला. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दरमहा विविध व्याख्यानांचे आयोजन करून मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.