मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला मराठी चित्रपट महोत्सव!

२४ व २५ मार्च रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन
पिंपरी : ‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील, उप आयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस कौस्तुभ कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी चित्रपट महोत्सवामध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ असे विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटांची निवड विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील प्रेक्षकांचा विचार करून करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
“तिकिटाची किंमत नाममात्र”
मराठी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणारे चित्रपट हे नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. महोत्सवामध्ये या चित्रपटासाठी नाममात्र ५० रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. हे तिकीट ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन तिकीट खरेदी ticketkhidakee.com या संकेतस्थळावर करता येईल. तसेच प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथेही २१ मार्च २०२५ पासून तिकीट विक्री सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय प्रेक्षकांना ७८९७८९७२४७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून तिकीट बुक करता येईल.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मराठी चित्रपट महोत्सव या उपक्रमांचा एक भाग आहे. मराठी भाषेचे सांस्कृतिक वैभव जनसमान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मराठी भाषेबद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण करण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका