विक्री केलेली मोटार बनावट चावीने पळविली!

पिंपरी : मोटारीची विक्री केल्यानंतर ती पुन्हा दुसऱ्या चावीने पळवून नेली आहे. पिंपळे सौदागर येथे दहा डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास प्रकार घडला. याप्रकरणी दोघा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोक रूपनारायण सोनकर (वय 37, रा. येडगाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार ऋषिकेश संतोष गांधी (रा. भोरवाडी, ता. जुन्नर) व संकेत सुरेश नेहरकर (रा. येडगाव, ता जुन्नर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी संबंधित मोटार ही फिर्यादी यांना पाच लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या करारनाम्यानुसार विक्री केली. त्यानुसार फिर्यादी यांनी ती मोटार त्यांच्या भावाच्या इमारतीमध्ये पार्कींग केली. तसेच त्या मोटारीमध्ये सोने व रोकड देखील होती. ती मोटर दोघांनी दुसऱ्या चावीने उघडून पळवून नेली. मोटार परत मागितल्याने संबंधितांनी शिवीगाळ केली.

मटका जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल!
पिंपरी : बेकायदा मटका जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बिजलीनगर येथे करण्यात आली. प्रमोद नागनाथ साठे (वय 38), मच्छिंद्र एकनाथ कांबळे (वय 60), माणिक गुंजाळ (वय 50), आनंद थोरात (वय 42 ), शिरसाठ अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी प्रीतम विलास फरांदे पोलीस शिपाई, यांनी शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर चिंचवड येथील हॉटेल जय मल्हारच्या मागील मोकळ्या जागेत काहीजण मटका जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी जुगार साहित्य व साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

