महात्मा फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार आजही मार्गदर्शक; महापौर रवि लांडगे!

महापालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा जो पाया घातला, तो भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना ज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आज स्त्रिया शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत असून प्रशासन, शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. ही प्रगती महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या विचारप्रवाहाचेच फलित आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा त्याग, त्यांचे सामाजिक कार्य आणि समतेसाठी दिलेला लढा अतुलनीय असून भारतीय समाजाला दिशा देणारा आहे. त्यांनी शिक्षण, स्त्री-मुक्ती आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे परिवर्तन घडवून आणले, ते आजही प्रेरणादायी आहे. अशा महापुरुषांचे विचार आणि साहित्य केवळ स्मरणदिनापुरते मर्यादित न राहता ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे.
आयुक्त विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणाच्या कार्याला अभिवादन करताना, त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाचे काम हे केवळ एक विकासकाम नसून, ते समाजप्रबोधनाचे आणि प्रेरणेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे. या स्मारकाचे काम प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे महापौर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

