मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा !

बळीराजाचे भलं व्हावं यासाठी विठुरायाच्या चरणी देवेंद्र फडणवीस यांचे साकडं ; मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील कैलास आणि कल्पना उगले यांना विठुरायाच्या महापूजेचा मान
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली .यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा उपस्थित होत्या. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिक मधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले .इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .
आज देवशयनी आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूर तीर्थक्षेत्र मध्ये हरिनामाच्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यामुळे सुमारे पंधरा लाखाहून अधिक भावी पंढरीत दाखल झाले आहेत. वैष्णवांची मांदे आळीने पंढरपूर भक्तीमय वातावरणात नाहून निघाले आहे.संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे .आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी .पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला .

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणलेला देवाचा पोशाख परिधान करण्यात आला . त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली . यंदा मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाला . मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला . देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले, विठू माऊली व रुक्माईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी ,कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली ,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .
आषाढी सोहळा भक्तीमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे चंद्रभागा वाळवंट 65 एकर परिसर ,दर्शन रांग व उपनगरीय भाग या यात्रेनिमित्त गजबजून गेला आहे . चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. पंढरपूर शहरात या यात्रेनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी करडी नजर आहे.

