माधुरी ओक यांचे सांस्कृतिक क्षेत्रात मौलिक योगदान : सलीम शिकलगार

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभीष्टचिंतन आणि जाहीर सत्कार
पिंपरी : ‘सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून माधुरी ओक यांचे प्राधिकरणातील सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रांत मौलिक योगदान आहे, असे गौरवोद्गार पिंपरी – चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार यांनी तारांगण सभागृह, , निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०७ सप्टेंबर रोजी काढले. ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी माधुरी ओक यांचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभीष्टचिंतन आणि जाहीर सत्कार करताना शिकलगार बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, आर. एस. कुमार, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर, अतुल इनामदार, शर्मिला महाजन, साहित्यिक राज अहेरराव, प्रा. तुकाराम पाटील, रमेश वाकनीस, नंदकुमार मुरडे, राजेंद्र घावटे यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती. नवचैतन्य भजनी मंडळातील महिलांनी ७५ दिव्यांनी माधुरी ओक यांचे विधिवत औक्षण करून सोहळ्याचा प्रारंभ केला.
मधुश्री कला आविष्कार या संस्थेची स्थापना करून माधुरी ओक यांनी प्राधिकरणात रुजवलेली नाट्य चळवळ, भजन स्पर्धा, व्याख्यानमाला, साहित्यविषयक उपक्रम याबाबत मान्यवरांनी मनोगतातून विविध आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना माधुरी ओक यांनी, ‘बालपणी वडिलांकडून साहित्याचा वारसा मिळाला. विवाहानंतर सर्व कुटुंबीयांनी सांस्कृतिक कार्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला; तसेच अनेकांच्या सहकार्यातून संस्थात्मक कार्यात सातत्य राखणे शक्य झाले. यासाठी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करते!’ अशी भावना व्यक्त केली. सलीम शिकलगार आणि राजेंद्र बाबर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.