अध्यात्माचा वसा आणि वारसा लाभलेले साहित्य चिरंजीव!

चौथे इंद्रायणी साहित्य संमेलन
पिंपरी : अध्यात्माचा वसा आणि वारसा लाभलेले साहित्य चिरंजीव असते,सा सूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल,, मोशी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी ‘आजची युवापिढी आणि साहित्य’ या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात डुडूळगाव – आळंदी येथील श्री शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या चर्चासत्रात शिक्षक – लेखक सचिन बेंडभर, पालक तेजस्विनी देशमुख, अभ्यासक रसिका सस्ते, विद्यार्थी शुभम दातखिळे आणि रामेश्वर मोरे सहभागी झाले होते.

संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चर्चासत्रात महाविद्यालयीन विद्यार्थी रामेश्वर मोरे याने, ‘अभ्यासासोबत अवांतर वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे’ , असे मत मांडले; तर शुभम दातखिळे याने, ‘पुस्तकाचा सुगंध डिजिटल माध्यमे देऊ शकत नाहीत. अर्थात संस्कृती दर्जेदार असेल तरच दर्जेदार साहित्य निर्माण होते!’ असा त्या मताला दुजोरा दिला. रसिका सस्ते यांनी, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी संबंधित साहित्य आवर्जून वाचले पाहिजे; कारण ते आपलेपणाची अनुभूती देते. संतसाहित्यातील ग्रंथ हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत!’ असे विचार व्यक्त केले.
तेजस्वी देशमुख यांनी पालकाच्या भूमिकेतून, ‘आजच्या काळात पुस्तकांपेक्षाही पुस्तकाबाहेरील अन्य माध्यमातून अभिव्यक्त झालेले साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचले जाते; मात्र हे साहित्य खूप गतिमान आहे. त्यामुळेच निश्चितपणे स्मार्ट बना; पण संवेदनशीलही बना; कारण साहित्यवाचन हे मनाचे योगासन आहे!’ अशी मीमांसा केली. सचिन बेंडभर यांनी, ‘आजच्या रिल्सच्या काळातही पुस्तक वाचणारे तरुण आहेत. तरुणांनी करिअर सांभाळून वाचनाचा व्यासंग जोपासला पाहिजे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी, ”सहितस्य भाव साहित्य!’ असे म्हटले जाते. शास्त्रीय आणि ललित असे साहित्याचे दोन मुख्य प्रकार आहेत; परंतु अभ्यासाव्यतिरिक्त संतसाहित्य हे शाश्वत साहित्य उपलब्ध आहे. त्यामध्ये अध्यात्म आणि संस्कृतीचा सखोल ऊहापोह केलेला आहे. त्यामुळे तरुण पिढीने साहित्यातील सर्व प्रकार अभ्यासावे, त्यातून अभिव्यक्त व्हावे; पण संतसाहित्यातील अध्यात्माचा वसा आणि वारसा आपल्या जगण्याचे प्रयोजन सांगत असतो, तो समजून घेतला पाहिजे!’ असे प्रतिपादन केले. मीनाक्षी डफळ – पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संगीता थोरात यांनी आभार मानले.

