भविष्यात एकटेपणा हा भयंकर रोग असेल : अभिनेत्री निवेदिता सराफ

निगडीत रंगला मेघ मल्हार संगीत महोत्सव
पिंपरी : जसे नृत्य,गायन, वादन एकमेकांच्या साथ संगती शिवाय अपूर्ण आहे तसेच आपल्या नात्याचे आहे. तंत्र ज्ञानाच्या काळात नवी पिढी आत्मकेंद्रित बनत आहे, याला आपणच जबाबदार आहोत. भविष्यात “एकटेपणा” हा भयंकर रोग असेल. असे मत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केले.

निगडी येथील नृत्य कला मंदिरच्या वतीने स्त्री तत्वाचा सन्मान या थीमवर आयोजित केलेल्या मेघ मल्हार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवेदिता सराफ, पं.अंजली पोहणकर,ज्ञान प्रबोधिनीचे संचालक मनोज देवळेकर, मेघ मल्हार समिती सदस्या नीरजा आपटे,नृत्य कला मंदिराच्या संचालिका तेजश्री अडिगे, अविनाश अडिगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सराफ म्हणाल्या कि, “बीन लग्नची गोष्ट” या आगामी चित्रपट हा नाते संबधावर प्रकाश टाकणारा आहे. आपल्यातील नाते संबंध दृढ व घट्ट करण्यासाठी संवाद साधत एकत्रित जेवले केले पाहिजेत. मोबाईल हे संवादाचे साधन म्हणून वापर करावा,मात्र तंत्र ज्ञानाच्या आहारी जावू नये. आज आपण यंत्र आणि मानव यांच्यातील स्पर्धा अनुभवत आहोत. यंत्रात आत्मा नसतो. मराठी सिनेमा जागरूक ठेवण्यासाठी थिएटरमध्ये जावून चित्रपट बघितला पाहिजेत.
पं .पोहनकर यांनी नृत्य कला संस्थेचे केले कौतुक
गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रातील नामवंत स्त्री कलाकारांनी आपली कला सादर केली. गुरु अडिगे म्हणाल्या कि, यावर्षी कै.अश्विनी पुरस्कार अभिनेत्री आणि नृत्यांगना नुपूर दैठणकर यांना जाहीर करीत आहे. रोख रक्कम २१ हजार,शाल श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या मल्हार महोत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. नृत्य कला मंदिर संस्थेचे त्री दशकपूर्तीचे वर्ष स्त्रीशक्तीला समर्पित केलेले आहे. विद्यार्थ्यांना अभिजात संगीत व नृत्याची ओळख व्हावी, त्याचा प्रसार व्हावा,आणि रसिकांना दर्जेदार कलापर्वणी अनुभवता यावी, हा या महोत्सव आयोजनाचा हेतू होता.
सुरुवातीला मुक्ता रास्ते ( तबला), अनुजा बोरुडे(पखवाज), अदिती गराडे (हार्मोनियम) यांनी केलेल्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. गौरी पाठारे यांनी गायलेल्या शास्त्रीय गाण्यावर वीणा भोसले, महेश्वरी जोशी, हरिप्रिया चौधरी यांनी भरतनाट्यम सादर केले. सुलक्षणा फाटक (तबला) सुप्रिया जोशी (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.
सूत्रसंचालन “रात्रीस खेळ चाले” फेम अभिनेत्री अश्विनी मुकादम, प्रियांका जोशी यांनी केले.