साहित्य हे दुःख कमी करण्याचे साधन! : राज आहेरराव

थेरगाव येथे लेखक – वाचक संवाद मेळावा संपन्न
पिंपरी : ‘साहित्य हे दुःख कमी करण्याचे साधन आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी राॅयल बँक्वेट हॉल, पवार इस्टेट, थेरगाव येथे शनिवार, दिनांक ०८ नोव्हेंबर रोजी केले. संवाद व्यासपीठ आयोजित लेखक – वाचक संवाद मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज आहेरराव बोलत होते. ज्येष्ठ लेखिका मानसी चिटणीस, लेखक प्रकाश निर्मळ, प्रा. संजय पवार, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, संवाद व्यासपीठचे संस्थापक – अध्यक्ष हरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होते .

राज आहेरराव पुढे म्हणाले की, ‘ज्यांना जे जे शक्य आहे ते ते त्यांनी वाचावे; कारण त्यामुळे दुःखावर मात करता येते. संतसाहित्याचे मूळ गीतेत आहे. संस्कृत गीतेचे प्राकृत रूपांतर करीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध केला; पण पुढे निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार त्यांनी अमृतानुभव हा अद्वितीय असा आध्यात्मिक ग्रंथ साकारला. समाजामध्ये प्रत्येकाला आणि विशेषत: साहित्यिकांना सत्संग आवश्यक आहे. तसेच कवींनी टाळ्या वाजविणाऱ्या मित्रांपेक्षा आपल्या कवितेतील सत्यार्थ दाखविणार्या रसिकांचा शोध घ्यावा!’ यावेळी दृष्टान्तकथा सांगून आहेरराव यांनी साहित्यातील विविध प्रकारांवर मार्गदर्शन केले. अन्य मान्यवरांनी उपस्थित वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपल्या मनोगतातून खुमासदार उत्तरे देत वाचकांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी हरीश मोरे यांनी प्रास्ताविकातून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी संवाद व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे, असे सांगून आपल्या संग्रहातील पाचशे वैविध्यपूर्ण पुस्तकांचा संच वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला.
त्यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात शोभा जोशी, माधुरी विधाटे, नीलेश शेंबेकर, श्रद्धा चटप, रेणुका हजारे, सुभाष चव्हाण, स्नेहा पाठक, स्वाती भोसले, अशोक होनराव, मनीषा पाटील, राजू जाधव यांनी विविध आशयगर्भ कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जयश्री श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष साळुंखे यांनी आभार मानले.

