खडकवासला, मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग!

नदी काठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा
पुणे : खडकवासला धरण,मुळशी धरण आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज मंगळवार दि.19 आ्ॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाल्याने मुठा, मुळा आणि पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे , उपविभागीयअभियंता, मोहन शां.भदाणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. नदी काठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 24827क्युसेक विसर्ग वाढवून सायंकाळी 5.00 वा.29084 क्यूसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
मुळशी धरण 97.91% भरले आहे व पाऊस अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 10600 क्यूसेक ने सुरू असणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून दुपारी ३:०० वाजता 19500 क्यूसेक करण्यात आला. तसेच पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती मुळशी धरण, टाटा पटावरचे, सुरेश कोंडूभैरी, यांनी दिली आहे.
तसेच पवना धरणाचा विसर्ग सायंकाळी 18.00 वाजता 9950 क्यूसेक करण्यात आला आहे.. अशी माहिती मोहन शां.भदाणे उपविभागीयअभियंता, मुठा कालवे पाटबंधारे यांनी दिली.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
खडकवासला धरण- 29084 क्यूसेक ,पवना धरण- 9950 क्युसेक , कासारसाई धरण- 1480 क्युसेक ,मुळशी धरण- 19500 क्युसेक , वडिवळे धरण-7574क्युसेक या प्रमाणे विसर्ग चालू आहेत.