उपमुख्यमंत्री पवार यांच्या अडचणीत वाढ; पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच!

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर मोदी गप्प का ?: राहुल गांधी
मुंबई : पुण्यातील मुंढवा भागातील सर्वे नंबर 88 मधील दस्ताची अवैधरित्या नोंदणी करण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महसुलाची हानी झाली असल्याचे विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाले आहे .या प्रसिद्धी माध्यमांची दखल घेऊन राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल मुद्रांक व नोंदणी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे .शासनाने या संदर्भात शासन आदेश जारी केला असून पुढील महिन्याभरात समितीकडून अहवाल मागवला आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी व्यवहारा प्रकरणी सविस्तर चौकशीच्या अनुषंगाने अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे .विभागीय आयुक्त पुणे ,जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे, सहसचिव मुद्रांक महसूल व वनविभाग मुंबई यांचा समावेश आहे .याबाबत असे समजते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा फटका बसू नये या उद्देशाने पार्थ पवार हे सदरील जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ती जमीन शासनाला परत दिली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र चौकशी समितीकडून संबंधित प्रकरणात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळाबाजार केला, त्यांच्यावर कारवाई होणार आहे .
सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील मुंढवा भागातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनी खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. 18 00 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी करून फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे .
राहुल गांधी यांचा थेट प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींना सवाल ?
या सर्व प्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींना सवाल विचारले आहेत .पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर मोदी गप्प का ?असा थेट सवाल केला आहे . महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली चाळीस एकर जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त तीनशे कोटी रुपयांना विकण्यात आली ,तसेच त्यावरील मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे ही एक लूट आहे आणि नंतर कायदेशीर सूट आहे .विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे .काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. माझा या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वये देखील संबंध नाही .मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरविले आहे असे ते म्हणाले.

