अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचं न्यायालयीन समितीचा अहवाल!

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरण
बई : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून गोळ्या झाडून एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा अहवाल वाचून दाखवण्यात आला. त्यामध्ये, अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालावर आता अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलंय.
बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचं न्यायालयीन समितीने अहवालात म्हटलं आहे. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले या अहवालानंतर अक्षयच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले. माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता.
आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात गदारोळ उठला, अनेकांनी या एन्काऊंटरचं स्वागत केलं तर विरोधकांनी एन्काऊंटर नसून ही हत्या असल्याचं म्हटलं होतं. आरोपीला शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे, पण पोलिसांनी कायदा हाती घेतल्याची प्रतिक्रिया देखील त्यावेळी विरोधकांनी दिली होती.
अहवालात अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. या अहवालाच्या वृत्तानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सरकावर टीका केली. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असेही म्हटले.
सरकार हस्तक्षेप करणार नाही : शिरसाट
बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल सादर केला, त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.