अजित पवारांची नाशिकमधून आज जनसन्मान यात्रा सुरु

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणुकीला सामोरं जाण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. तरीही आघाडी आणि युती दोहोंनी विजयाचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसन्मान यात्रा आजपासून सुरू केली आहे.
अजित पवारांची नाशिकमधून आज जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहिणींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटते आहे ते ती भूमिका मांडत आहे. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.