सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या साक्षीने चौथा दिवस जल्लोषात पार पडला!

पिंपरी : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचा चौथा दिवस अभूतपूर्व उत्साहात, विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित या पर्वाने शहरवासीयांना प्रेरणादायी विचार, सृजनशील कलाविष्कार आणि समाजजागृती यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळाली.
चौथ्या दिवसाची सुरूवात “धम्मपहाट” या शास्त्रीय संगीताने सजलेल्या कार्यक्रमाने झाली. यामध्ये ख्यातनाम गायक डॉ. मधुकर मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुद्ध व भीमगीतांचा समावेश असलेल्या सुमधुर रचना सादर केल्या. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भीमरावांचा जीवनप्रवास आणि धम्मसंस्कृतीचा गौरव त्यांनी रचनांमधून अधोरेखित केला.
यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक-संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संविधानविषयक गीतगायनाने वातावरण भारावून टाकले. “ये मेरा संविधान”, “संविधान समजूनी”, “लिहिली घटना”, “संविधान देशाचा प्राण आहे” अशा गीतांमधून त्यांनी प्रेक्षकांना संविधानाचे मर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी समजावून सांगितली. कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
“भीमसृष्टी” येथे जय पेरसापेन आदिवासी नृत्य पथक (अहेरी, गडचिरोली) यांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांना आदिवासी जीवनशैली आणि भीम प्रेरणेची झलक दाखवली. “माझा भीमराया”, “सोन्यान भरली ओटी” अशा गीतांवर त्यांनी सादर केलेले नृत्य बहुसंख्य प्रेक्षकांना भावून गेले. गायक सुरेश वलादी यांनी त्यांच्या बोली भाषेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला. महापालिकेच्या वतीने या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
दिया बनसोडे आणि सहकारी युवतींनी सादर केलेल्या फ्लॅश मॉब शैलीतील समूह नृत्यांनी संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले. ८ ते २१ वयोगटातील मुलींनी “तुला देव म्हणावं की भीमराया म्हणावं”, “भीमाने लिहिला कायदा” या गीतांवर नृत्य सादर करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आणि महामानवाला सन्मानपूर्वक अभिवादन केले.
फ्रेण्डस ग्रुप ऑफ सिद्धार्थ प्रस्तुत परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. प्रवीण डोने आणि सिने कलाकार शिरीष पवार यांनी त्यांच्या प्रभावी आवाजात परिवर्तनाची साद घालणाऱ्या गीतांची सुरेख मांडणी केली. भीमस्पंदनाने भारलेले हे गीतगायन टाळ्यांच्या गजरात रंगत गेले.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ गायिका चंद्रभागा गायकवाड आणि सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्या आवाजाने सभागृह भारावून गेले. “लय बळ आलं माझ्या दुबळ्या बाळाला”, “झोपडीत सूर्य आला तुझ्यामुळे” या गीतांनी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय वाटचालीचे शब्दचित्र उभे केले. गायक अजय देहाडे यांनी त्यांच्या “तुफानातले दिवे” या कार्यक्रमातून सामाजिक अन्याय, विषमता आणि संघर्षाची वास्तव चित्रे मांडली. त्यांच्या गीतांनी उपस्थितांमध्ये विचारांची लहर उमटवली. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित सामाजिक संदेश गीतांद्वारे प्रबोधनाचे कार्य केले.

सायंकाळी इंजि. पवन दवंडे यांच्या प्रबोधनपर खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी विविध लोकगीते, अभंग व किर्तनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर केला तसेच आपल्या खंजिरीच्या तालावर उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले. यानंतर सिनेगायक व संगीतकार विष्णू शिंदे आणि प्रसिद्ध लोकगायिका मीरा उमप यांनी पारंपरिक आणि समकालीन संगीताचा सुरेख मिलाफ साधत प्रेरणादायी गीतांची मेजवानी दिली. त्यांच्या गीतगायनाने उपस्थितांच्या अंतःकरणात आंबेडकरी मूल्यांचा ठसा उमटवला.
चौथ्या दिवसाचा समारोप “महासंगीताचा आंबेडकरी जलसा – तुझ्या पाऊल खुणा भीमराया” या विशेष कार्यक्रमाने झाला. यामध्ये प्रसिद्ध गायक चेतन चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीतांची सुरेल मैफल रंगवली. समारोपाच्या क्षणी “जय भीम” च्या सामूहिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि एकता, समता आणि बंधुतेचा संदेश प्रबळ झाला.