द्रुतगती महामार्गावर अपघातात १४ जखमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर टेम्पो आणि खासगी बासच्या अपघातात १४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज पहाटे ३ वाजता हा अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसमध्ये ११ प्रवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबड्या घेऊन जाणाऱ्या या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्यामुळे तो प्रवासी बसला मागच्या बाजूने धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, बस महामार्गावर पलटली आणि रस्त्यालगत असलेल्या मोठ्या २० फूट खोल खड्ड्यात पडली.प्रवासी बसचा चालक, टेम्पोमधील तीन प्रवासी आणि बसमधील सगळे प्रवासी यात जखमी झाले आहेत.
जखमींना खोपोलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी किरकोळ जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खोपोली पोलिस पुढील तपास करत आहेत.