पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृ्त्तसंस्था) : कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान आता थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून दोन्ही देशांदरम्यानचे तणाव निवळून आता संवादासाठी पावले उचलली जाऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल चीनचे परराष्ट्र सचिव सन वेइतोंग यांची बिजींग इथे जाऊन भेट घेतली. या चर्चेत दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले. यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात कझान येथे झालेल्या बैठकीत दोन्ही देशादरम्यान द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेण्यात आला. कोविडच्या पहिल्या लाटेमुळे यात्रा होऊ शकली नाही. त्यानंतर पुढे पाच वर्षे कैलास मानसरोवर यात्रा झालीच नव्हती.
नद्यांसंदर्भात सहकार्य आणि हायड्रोलॉजीकल डेटाच्या तरतुदीवर चर्चा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भारत आणि चीन यांनी परस्परांकडे संशयाने पाहण्याऐवजी परस्पर समजुतीने रहायला हवे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांनी म्हटले आहे. २०२५ च्या उन्हाळ्यापासून ही विमानसेवा पूर्ववत करण्याचा दोन्ही देशांचा विचार आहे.