सीबीएसई दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) अंतर्गत शैक्षणिक पद्धतीमध्ये आता मोठे बदल होत आहेत. या सुधारणा प्रक्रियेचाच एक भाग म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यात या मसुद्याला मंजुरी मिळाली आहे. येत्या २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित केली जाणार आहे. या निर्णयामुळे परीक्षा कधी द्यायची हे ठरविण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. परीक्षेची वेळ आणि पद्धच निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. एखादा विद्यार्थी परीक्षेला दोनदा बसला तर दोन्ही पैकी त्याच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल.
विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे, त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे हा या मागचा उद्देश आहे. परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे दरम्यान पार पडणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असेल. परीक्षा दोन वेळा होणार असली तरीही प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत परीक्षा (इंटर्नल असेसमेंट) वर्षातून एकदाच होणार आहे. हा मसुदा सीबीएसईच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला असून येत्या ९ मार्च २०२५ पर्यंत शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना या मसुद्यावर अभिप्राय देता येणार आहे.