आयटी अभियंते सायबर फसवणुकीला सर्वाधीक बळी पडतात : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

पैसे देण्यासाठी सार्वजनिक वायफाय वापरणे टाळावे
पिंपरी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना सर्व तांत्रिक गोष्टींची माहिती असताना देखील केवळ पैशांच्या हवेशापोटी अनेक आयटी अभियंते फसवणुकीला बळी पडत आहेत. डिजिटल अटकेच्या फसवणुकीत ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात अडकत आहेत .डिजिटल अटक अशी कोणतीही संकल्पना कायद्यात अस्तित्वात नाही सायबर गुन्हेगार नागरिकांना अमिष आणि भीती या भावनांच्या आधारे आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर सुरक्षा बाबत नागरिकांशी ऑनलाइन माध्यमातून संवाद साधला. यामध्ये शाळा महाविद्यालय ,माहिती तंत्रज्ञान कंपन्या ,उत्पादन करणाऱ्या कंपन्या, ज्येष्ठ नागरिक, हाउसिंग सोसायटी मधील 12000 प्रतिनिधी तर 33 हजार 844 नागरिकांची ऑनलाईन हजेरी अशा 45 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उपस्थिती लावली. नागरिकांच्या सर्व प्रश्नांना आयुक्तांनी ऑनलाइन उत्तरे दिली .पिंपरी चिंचवड शहर हे वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे शहरात विविध शैक्षणिक संस्था वाढत असून या संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे.
विद्यार्थ्यांची नोकरी आणि कार्य प्रशिक्षण बाबत खोटे संदेश लिंक पाठवून फसवणूक होते .त्याबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना आयुक्त चोबे म्हणाले, नोकरी संदर्भातील माहितीसाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. नोकरीची ऑफर देणाऱ्या ई-मेलचे डोमेन नेम काय आहे हे तपासावे. महत्त्वाच्या कंपन्या कधीही नोंदणी अथवा नोकरीसाठी पैसे घेत नाहीत. महाविद्यालयाच्या विभागाकडून नोकरीच्या ऑफर मेलची खात्री करून घ्यावी, खात्री केल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये असे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित कसे राहावेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आयुक्त म्हणाले पैसे देण्यासाठी सार्वजनिक वायफाय वापरणे टाळावे. ऑनलाईन पैसे देताना कुठेही कार्ड ची माहिती जतन करून ठेवू नका .
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कामगिरी बाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले .प्ले स्टोअर, ॲपल, ॲप स्टोअर वरून कोणतेही कर्ज देणारे ॲप डाऊनलोड करताना त्याखाली दिलेले मत किती लोकांनी डाउनलोड केले आहे. एप्लीकेशन इन्स्टॉल करताना गोपनीयतेची परवानगी मागत आहे का हे पाहणे आवश्यक आहे .कोणतेही अधिकृत ॲप अशी माहिती मागत नाही .ॲपची माहिती संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर असते. ॲप डाऊनलोड करताना गोपनीय माहिती मिळविली जाते. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे भीती घालून पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे असे कोणतेही ॲप डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला .सायबर गुन्हेगारी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे मात्र या सायबर गुन्हेगारीत सुशिक्षित आणि आयटीआय ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर अडकतात

