महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक!

वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी : महागड्या कारची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्या टोळीकडून ६० लाख रुपये किंमतीच्या कार हस्तगत केल्या आहेत. अल्ताफ कासम अत्तार (वय ४० रा. शितलानगर, देहूरोड), जुबेर कयामुद्दीन कुरेशी (वय ३४, रा. उत्तर प्रदेश), मुसाहिद अलीयास खान (वय ३१, रा. हरियाना) आणि नानीशार कमर अली (वय ३८, रा. मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील काही महिन्यांपासून कार चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी द्रुतगती मार्गासह सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, तसेच तांत्रिक तपासावरुन तीन आरोपींना थेरगाव येथून अटक केली.
आरोपींनी वाकडमधील गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांच्याकडून तीन क्रेटा कार हस्तगत केल्या. आरोपींकडून नवी मुंबईसह नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक आरोपी अल्ताफ अत्तार हा शहरात गाडीचा शोध घ्यायचा. गाडी चोरल्यानंतर टोलनाके चुकवत तो लोणावळा येथे गाडी पोहचवायचा. चोरी करताना फोडलेली काच बदलण्यासाठी अगोदरच काच सोबत ठेवत असे. आरोपी मुसाहिद अलीयास खान हा हुंदाई कंपनीच्या गाड्याचा एक्स्पर्ट मेकॅनिक आहे. त्याने गाड्या चोरी करण्यासाठी बनावट चाव्या आणल्या. ओवीडी स्कॅनर डिव्हॉइसव्दारे गाडीची चावी मॅच करून गाडी चोरून नेत असे. आरोपी जुबेर कुरेशी गाड्यांच्या स्पेअर पार्टची भारतभर विक्री करतो. आरोपींकडून ५४ लाख ४३ हजार ३१० रुपये किंमतीच्या ०३ हुंदाई क्रेटा कार, ०१ किया सेल्टॉस, स्नॅकर, कि- मेकर, स्कू- ड्रायव्हर, पकड, विविध कंपनीच्या ४० गाडीच्या चाव्या, नंबर प्लेट व सात मोबाइल फोन जप्त केले आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गवारी, वंदु गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौतेंय खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दिपक साबळे, मंगेश लोखंडे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत.