आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा : महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा
पिंपरी : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार असून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या माध्यमातून शहरातील कलाकार घडतील व शहराची सांस्कृतिक जडणघडण होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ चे आयोजन ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेता क्षितिज दाते, मुख्यमंत्री सहाय्यक शुभम सातकर, चित्रपट निर्माते विजय चौधरी, फिल्म सिटी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, विजय गुंड, डी. वाय. पाटील फेडरेशनचे विद्यानंद मानकर, मच्छिंद्र धुमाळ, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड, अभिषेक अवचार, डॉ. विश्वास शेंबेकर, जय भोसले, पूजा गुंड, श्रुती शेंबेकर यांच्यासह चित्रपट रसिक उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘मी स्वतः कलारसिक आहे. मला चित्रपट पाहण्याचा छंद आहे. मी स्थानिक भाषेपासून विविध भाषेतील चित्रपट पाहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील देखील चित्रपट मी पाहत असतो. चित्रपटामध्ये आपण स्वतःला पाहत असतो. आपलेच एक कथानक रुपेरी पडद्यावर पाहताना आपण चित्रपटाशी समरस होत जातो. चित्रपट ताणतणाव घालवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी चित्रपट हे माध्यम खूप उपयुक्त आहे. या माध्यमातून सकारात्मक जीवन घडवण्यासाठी मदत होत असते. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चित्रपटासारख्या कलाकृती पाहिल्यामुळे जीवनात एक सकारात्मक बदल घडत असतो, असे देखील महापौर रवि लांडगे म्हणाले.

