फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पुणे

हिंजवडी, चाकणमधील रस्ते विकास प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!

हिंजवडी, चाकणमधील रस्ते विकास प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक
पिंपरी : हिंजवडीसह चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणासह परिसरातील अनधिकृत बांधकामे , अतिक्रमणे काढण्यात येत असल्याने रहदारी सुरळीत होण्यास मोठी मदत होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. त्या अनुषंगाने सुरु असलेली विकास कामे, कारवाईसंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

viara vcc
viara vcc

हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतूक कोंडी निराकरणासह नागरी समस्या सोडव‍िण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरु आहे. या भागातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी या पर‍िसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्याची कारवाई पीएमआरडीएसह त्या- त्या स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे. हिंजवडी भागातील १९ किलोमीटर पर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली असून या भागातील अरुंद रस्ते रुंद करत काही नवीन रस्ते प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने तातडीने मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी दिले.

लक्ष्मी चौक ते मेझा – ९ हॉटेल, पांडवनगर ते माणगाव ते फेस ३, लक्ष्मी चौक ते मारुंजी ते कोलते पाटील गेट, लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मधुबन हॉटेल ते छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक ते एमआयडीसी हद्दीपर्यंत, कासारसाई रोड, छत्रपती शिवाजी चौक ते हिंजवडी गावठाण (स्मशानभूमी रोड), प्राइड रोड ते विप्रो सर्कल, शिवाजी चौक ते पद्मभूषण चौक यासह इतर भागातील रस्त्यासंदर्भातील चर्चा करण्यात आली. माण, हिंजवडी, मारुंजी आदी भागातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने पर्यायी रस्त्यांसंदर्भात सुरू असलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, अनधिकृत बांधकाम विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, जमीन मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांच्यासह जलसंपदा विभाग, एमआयडीसी, एमएसईबी, एमपीसीबी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चाकण भागात आठवड्याभरात कार्यवाही
हिंजवडी भागातील अतिक्रमणावर केलेल्या कारवाईनंतर आता आठवड्याभरात पीएमआरडीएसह इतर प्रशासकीय यंत्रणा चाकण भागातील रहदारी सुरळीत करण्याच्या अनुषंगाने मोर्चा वळवणार आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी सोमवारपासून ठोस पावले उचलण्यात येणार आहे. यासह पुणे नाशिक रस्ता नाशिक फाटा ते राजगुरू नगर उन्नत मार्ग, चाकण – तळेगाव – शिक्रापूर, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे व वाहतूक कोंडी, ट्रक टर्मिनल, चाकण भागातील बाह्यवळण रस्ते यासह इतर रस्ते आण‍ि नागरी समस्यांच्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणांकडून आढावा घेतला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"