घुसखोर बांगलादेशी महिलेसह पतीला अटक, चिखली पोलिसांची कारवाई!

पिंपरी : चिखलीतील भंगार व्यावसायिकाने पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोर महिलेसोबत विवाह करून तिला आश्रय दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. महिलेचा पर्यटन व्हिसा संपल्यानंतर तिला बांगलादेशात परत पाठवणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. याप्रकरणी बांगलादेशी घुसखोर महिलेसह तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना ७ एप्रिल २०२२ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत चिखलीतील कुदळवाडी येथे घडली.
मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (३३, रा. तळवडे, मूळ उत्तर प्रदेश) आणि त्याची बांगलादेशी घुसखोर पत्नी (३०) यांना अटक करण्यात आली आहे. तिच्या १६ वर्षीय मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची बांगलादेशी नागरिक असून तिचा पहिला पती बांगलादेशात वेल्डिंगचे काम करतो. दरम्यान, सन २०१७ पासून पर्यटन व्हिसावर भारतात ये-जा करीत होती. मुंबईतही काही काळ वास्तव्यास होती. तिची आणि मोहम्मद राणा यांची फेसबुकवरून ओळख झाली होती.
मोहम्मद राणा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, सध्या चिखलीत भंगार व्यवसाय करतो. डिसेंबर २०२१ मध्ये ती पुन्हा पर्यटन व्हिसावर चिखलीत आली आणि राणाला भेटली. त्या वेळी ती आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या १६ वर्षीय मुलालाही सोबत घेऊन आली होती.

मोहम्मद राणाने आरोपी महिला बांगलादेशी असल्याची माहिती असतानाही तिच्याशी विवाह केला. त्यांना सव्वा वर्षाचा एक मुलगा आहे. ती गेल्या सव्वातीन वर्षांपासून चिखलीत वास्तव्यास होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी बांगलादेशी महिलेसह मोहम्मद राणाला अटक केली. महिलेसोबत आलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोमारे करत आहेत.