उद्योगनगरीत मोठ्या प्राण्यांच्या दहनयंत्राची सोय
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे श्वान, मांजर या प्राण्यांसाठी दहन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या जनावरांसाठी अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते प्राणी पुण्यातील दहनयंत्रामध्ये पाठविण्यात येत होते. मात्र, आता पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या जनावरांसाठी दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय आता टळणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.

पिंपरी-नेहरूनगर येथे महापालिकेच्या वतीने शहरात प्राणी शुश्रूषा केंद्र (अँनिमल शेल्टर हाउस) भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणी शुश्रूषा केंद्राच्या माध्यमातून पाळीव, भटक्या श्वानांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी श्वानांसाठी दहन मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये दहनासाठी प्राण्यांच्या वजनानुसार वेळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे. साधारण तीन तासांत मोठ्या प्राण्याचे दहन मशीनमध्ये होईल, असे पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये श्वान, मांजर यांचा समावेश आहे. दर महिन्याला साधारण 35 ते 40 मोठे प्राणी दहनासाठी येतात. त्यामुळे ही संख्या मोठी असून शहरात अद्यावत मशीनची आवश्यकता हाेती. पाळीव प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा या प्राण्यांसाठीदेखील दहन मशीन असावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार अद्यावत आणि पर्यावरणपूरक मशीन बसविण्यात आले आहे. हे मशीन सीएनजी गॅसवर चालते, असे सांगण्यात आले.