महेश लांडगे यांच्या नावाला पसंती

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यानंतर आमदार लांडगे यांना उमेदवारी देण्याचा ठरावही केला आणि तो निरीक्षकांना पाठविण्यात आला.
भारतीय जनता पक्षातील स्पर्धकांनी पक्षांतर केल्याने भोसरीतून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकमेव आमदार महेश लांडगे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपकडून लांडगे हे एकमेव इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि भोसरीतही भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. पिंपरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ’ असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार भाजपचे प्रभारी नेता प्रदीपसिंग जडेजा यांच्या उपस्थितीत चिंचवड आणि भोसरीतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
चिंचवडमध्ये निवडणूक लढविण्यासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप आणि तिसऱ्या क्रमांकावर विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे यांची नावे देण्यात आली आहेत. भोसरीतून केवळ आमदार महेश लांडगे यांचे एकट्याचेच नाव देण्यात आले. तसेच आमदार लांडगे हे एकटेच इच्छुक असून त्यांना उमेदवारी देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अलिकडेच फूट पडली आहे. निवडणूक लढविण्यासाठी माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी २० माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीत भोसरीची जागा कोणाला मिळणार हा पेच आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचा भोसरीवर दावा आहे. भाजपकडून आमदार लांडगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडेच्या उमेदवाराची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.