दगडूशेठ गणपती यंदाही चार वाजता मिरवणुकीत येणार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची थाटात सांगता करत असतानाच विसर्जनाच्या परंपरेचे महत्त्व कायम राखण्यासाठी यंदाही पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरूण मंडळाच्या वतीने मंडळाच्या मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरुवात होणार आहे.
वर्षानुवर्षे दिव्यांची रोषणाई असलेला रथ ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची खासियत आहे. त्यामुळे ही रोषणाई पाहण्यासाठी मध्यरात्रीसुद्धा पुणेकर घराबाहेर पडत असत आणि पहाटेपर्यंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक पाहात असत. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. त्यामुळे मागील वर्षी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी झाले होते. यंदा देखील भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.
मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.