पुण्यात भर पावसात शरद पवारांचे आंदोलन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा राज्यव्यापी बंद करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर राज्यभरात आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्यभरात मूक आंदोलन सुरू झाले आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून, भर पावसात शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुक आंदोलन असल्याने आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळा मास्क लावला आहे तसेच हाताला काळ्या फिती लावल्या आहेत.
शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार, महापौर, कार्यकर्ते याच्या उपस्थितीत पुण्यात आज भर पावसात हे मूक आंदोलन करीत आहेत. केले जात आहे. पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे. रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेनेचे बाबर, प्रशांत जगताप, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्याच्या उपस्थितीत आज मूक आंदोलन केले जात आहे.आज (शनिवार) सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन केले जात आहे.
मुंबईत उद्धव ठाकरेही सहभागी
मुंबईतही हे आंदोलन सुरू आहे. दादर परिसरात सुरू असलेल्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत आंदोलनात सहभागी झाले आहेत. काळा मास्क, काळे झेंडे आणि काळ्या फिती वापरून हे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नाना पटोले ठाण्यात सहभागी
ठाण्यातही भर पावसात आंदोलन सुरू आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली ठाण्यातले आंदोलन सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आंबादास दानवे यांनी येथील आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
1 Comment
बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करणार्या जनतेला राजकीय आंदोलन म्हणणे ही शिंदे व फडणवीस यांची मोठी चूक आहे.
काहीही झाले तरी विरोधकांनाच उलट नावे ठेवणे, विरोधक सत्तेत असताना झालेल्या न झालेल्या घटनांची यादी घोळवत बसणे, ही सरकारची भावनाशून्य मानसिकता दाखवते.
लिखाण छान 👌