लोकलमध्ये आता ज्येष्ठांसाठी डबा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतला लोकल प्रवास ही सगळ्यांसाठीच त्रासाची बाब असते. अहोरात्र लोकलच्या फेऱ्या सुरू असतानाही प्रत्येक लोकल नेहमीच प्रचंड गर्दीने भरलेली असते, हा इथल्या प्रत्येक प्रवाशाचा अनुभव आहे. गर्दी विभागली जाण्यासाठी महिलांसाठी विशेष लोकल सुरू झाली, तरीही रोजच्या दिवसाला गर्दीचा लोंढा येतच आहे. अशातच ज्येष्ठांना या गर्दीतून प्रवास करणे खूप जिकिरीचे असते. यासाठी रेल्वेने उत्तम निर्णय घेतला आहे.
वाढत्या गर्दीमुळे रेल्वेतून प्रवास करणं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकदा त्रासदायक असल्याने रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. लोकलमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश देखील काढण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा
मुंबईत लोकलमध्ये ज्या प्रमाणे अपंग प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे वेगळा डब्बा आहे, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डब्बा असावा अशी मागणी के.पी.पी नायर या वकिलांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. यानंतर रेल्वे मंडळाने यासाठी लागणारा खर्च आणि इतर व्यवहार्यता याचा अभ्यास केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कार्यादेशासाठी उशीर होत असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने बुधवारी याबाबत नाराजी व्यक्त केली. येत्या दोन वर्षात केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करुन दिला जाईल असं रेल्वे प्रशासनाकडून न्यायालयाला सांगण्यात आलं आहे.
सध्या ज्येष्ठांना मालडबा वापरता येईल
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्याची सोय होईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवासाची परवानगी देण्यात येणाचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. पुढील दोन वर्षात पश्चिम रेल्वेतील १०५ डब्ब्यांचं आणि मध्य रेल्वेच्या १५५ डब्ब्यांचं ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्ब्यात रुपांतर होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून खंडपीठाला देण्यात आली आहे.