मुख्यमंत्री नक्की होणार कोण?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यातली निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आज सायंकाळी शांत होईल. परवा म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. त्यानंतर आठवड्याभरात राज्यात नवीन सरकार कोणाचं स्थापन होईल, याचा निर्णय होईलच. मात्र, आता मी मुख्यमंत्रपदाच्या शर्यतीत नाही, असं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यात आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फूट पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन पक्ष संघटनांमध्ये थेट चुरशीची लढत दिसणार आहे. इकडे महाविकास आघाडीने सुद्धा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, हे सांगितलेच नव्हते. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव लावून धरले असले तरीही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे कोणताही चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी ठरविण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्याचा विकास करण्यासाठी महायुती बहुमताने निवडून आणणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे महायुतीत कधीच मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही. आमचे नेते पदासाठी काम करत नाहीत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वाद आहेत. अडीच वर्षांच्या कालावधीत घरात बसून राज्याचा कारभार पाहणारे फेसबुक मुख्यमंत्रीसुद्धा या राज्याने पाहिले आहेत, अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे. आम्हाला सगळ्यांना मात्र, आता फक्त कामाचा ध्यास आणि आणि महाराष्ट्राच्या विकासाची आस आहे.
फडणवीस शर्यतीत नाहीत?
मागील निवडणुकीत मी पुन्हा येईन.. असे म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागेच यंदा आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. यानंतर देखील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. अशातच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट म्हटलंय. मी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजप संसदीय मंडळाचा असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राा दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रीपदावर भूमिका स्पष्ट केली आहे.