भोसरीत महेश लांडगे यांची हॅट्रिक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी हॅटट्रिक साधली आहे. तब्बल ६४ हजार ६९१ मतांनी हा विजय मिळविला आहे.
मतमोजणीत चौथ्या फेरी अखेर महेश लांडगे यांना ३९,००० तर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना २६,००० मते मिळाली होती. अगदी पहिल्या फेरीपासून लांडगे यांना आघाडी मिळाली असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. या मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे, महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्या लढत आहे.
भोसरीच्या मतमोजणीसाठी २२ टेबलांवर २३ फेऱ्या पार पडल्या. टपाली आणि इलेक्ट्रॉल व्होटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र मोजणी पथकेही नेमण्यात आली होती. विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच हजारो मतांची आघाडी घेतली होती, ती अगदी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
अशी झाली लढत
भोसरी मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. भोसरीत सुमारे ६१.५४ टक्के मतदान झाले होते. एकूण ३,७४,४२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास १,११,३७६ एवढे अधिकचे मतदान यावेळी झाले होते.
पहिल्या फेरीमध्ये लांडगे २,२०९ मतांनी आघाडीवर होते. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांना ५,४८२ तर महेश लांडगे यांना ७,६९१ मते होती. तिसऱ्या फेरीत महेश लांडगे ११ हजारांनी आघाडीवर गेले. चौथ्या फेरीत लांडगे पुन्हा १३ हजारांनी आघाडीवर होते. या फेरीत लांडगे यांना ३९,००० तर गव्हाणे यांना २६,००० मते मिळाली. आणि भोसरी सहाव्या फेरीअखेर महेश लांडगे यांनी २०,००० मतांची आघाडी घेतली.

महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द
२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारले होते. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यांनी ती अपक्ष निवडणूक जिंकली आणि नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मग २०१९ मध्ये ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले आणि आता ही विजयी घोडदौड कायम ठेवत यंदा त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.
राजकारणात येण्यापूर्वी लांडगे हे नावाजलेले पैलवान होते. काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा एनएसयूआय मधून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. २००२ मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची पहिली निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता. नंतर पोटनिवडणूक लढवली आणि २००४ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि तिथेही त्यांनी हॅटट्रिक केली.
महेशदादांच्या यशाचे गमक
हिंदुत्त्व विचारांची जमेची बाजू, बैलगाडा शैर्यतींसाठी झपाटून केलेले काम याखेरीज पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान हे महेशदादांच्या यशाचे गमक असल्याचे कार्यकर्ते सांगतात. अनेक वर्षांपासून रखडलेला शास्तीकराचा प्रश्न, इंद्रायणी नदी सुधारणा प्रकल्पाला मिळवून दिलेला निधी, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, समाविष्ट भागांना २५ वर्षांनंतर मिळवून दिलेला निधी, संतपीठ, तसेच छत्रपती संभाजी मगाराजांचा भव्य पुतळा, संविधान भवनाची पायाभरणी, मोशी आणि चऱ्होली परिसरात कचरामुक्तीसाठी पुढाकार आणि स्वारगेट ते निगडी मेट्रो व भोसरी ते चाकण डीपीआरसाठी केलेला पाठपुरावा या भरीव कामांमुळे महेश लांडगे यांनी हॅटट्रिक सहज पार केल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.