आयएफएससी आशियाई स्पर्धेमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ : आ. शंकर जगताप

पिंपरी चिंचवड मध्ये ४ नोव्हेंबर पर्यंत स्पर्धा रंगणार, १३ देशातील सुमारे २०० परदेशी खेळाडूंचा सहभाग
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या आयएफएससी आशियाई स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळत आहे. शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी आणि राज्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे,’ असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सह आयोजकत्वाने आय.एफ.एस.सी. एशिया यांच्या मान्यतेने तसेच भारतीय पर्वतारोहण संस्थान आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील महानगरपालिकेच्या योगा उद्यानातील पी.सी.एम.सी. क्लायबिंग वॉल येथे दि. १ ते ४ नोव्हेंबर या काळात येथील आय.एफ.एस.सी. एशिया किडस् अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आलेले होते,या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांचे हस्ते काल संध्याकाळी संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली आयोजित या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास माजी नगरसदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, निर्मला कुटे,भारतीय पर्वतारोहण संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल विजय सिंग, आय एफ एस सी एशियाचे सेक्रेटरी जनरल रासिप इसनीन, व्हाईस प्रेसिडेंट किर्ती पायस, भारतीय पर्वतारोहण संस्थान पश्चिम विभागाचे चेअरमन के. सरस्वती, सचिव श्रीकृष्ण कडूसकर, महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके, कर्नल देवांग नायक,सागर पालकर, नम्रता निकम,अकबल अमीन,डॉ. राधिका पाटील, किर्ती शेट्टी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहेत आणि पिंपरी चिंचवड महापालिका या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे,असे सांगून त्यांनी भविष्यातही महापालिका अशा स्पर्धांना संपूर्ण पाठबळ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख या पिंपरी चिंचवडमधील अतिशय वेगाने वाढणाऱ्या भागात या प्रकल्पाचे काम झाल्यामुळे आणि या भागात दळणवळणासाठी अतिशय उत्तम सुविधा असल्याने या भागातील आणि संपूर्ण शहरातील खेळाडूंना व नागरिकांना याचा लाभ होईल, अशी माहिती यावेळी माजी नगरसदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे,विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशनचे सचिव किर्ती पायास यांनी केले तर जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
१३ देशातील खेळाडू सहभागी
या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. १ ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा पार पडत आहे. यात भारतासह जपान, चीन, थायलंड, दक्षिण कोरिया, जॉर्डन, मलेशिया, हाँगकाँग (चीन), सिंगापूर, इराण, कझाकस्तान, फिलिपाइन्स आणि किर्गिझस्तान अशा विविध १३ देशांतील सुमारे २०० युवा खेळाडू सहभागी झाले आहेत.
सांस्कृतिक सादरीकरण आणि पारंपरिक स्वागत
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक स्वागतगीत नृत्याने झाली. त्यानंतर सादर झालेल्या कथक नृत्याने समारंभाला संस्कृतीचा ठसा दिला. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला, तर पंजाबी वाद्यांच्या जोशपूर्ण तालावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नृत्याचा आनंद घेतला. विविध रंगी वेशभूषेत सजलेले कलाकार आणि नृत्यसमूह यांनी उदघाटन सोहळ्याला कलात्मक स्वरूप दिले.

