फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

सावधान! भारतात एचएमपीव्हीचा शिरकाव!

सावधान! भारतात एचएमपीव्हीचा शिरकाव!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
बंगळुरू (पीटीआय) : भारतात एचएमपीव्ही (HMPV) विषाणूचा शिरकाव झाला आहे. बंगळुरु शहरातील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये आठ महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV)ची लागण झाल्याचे आढळले आहे. हे बाळ देशातील एचएमपीव्ही बाधित पहिला रुग्ण ठरले आहे.

यासंदर्भात पीटीआयने सविस्तर वृत्त दिले आहे. कर्नाटक राज्याच्या आरोग्य विभागाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे, त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत नमुन्याची चाचणी केली नाही, परंतु खाजगी रुग्णालयाच्या निष्कर्षांवर शंका घेण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. “एचएमपीव्ही रुग्णाबाबत अहवाल खाजगी रुग्णालयातून आले आहेत, मात्र त्यांच्या चाचण्यांच्या अचूकतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह लावण्याचे कारण नाही” असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

एचएमपीव्ही विषाणू म्हणजे काय?
तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण एचएमपीव्ही विषाणू आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्‌समध्ये सन २००१ मध्ये आढळला होता. एचएमपीव्ही या सामान्य श्वसन विषाणूच्या संसर्गाचे सर्दी हे प्रमुख लक्षण आहे. श्वसनमार्गाचे विकार (आरएसव्ही) आणि फ्लूप्रमाणे हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा त्रास उद्धवतो. त्या अनुषंगाने एनसीडीसी (दिल्ली) यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये महाराष्ट्रात आत्तापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सुरक्षित!
चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या; तरी राज्यामध्ये अशा कोणत्याही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूमुळे तीव्र श्वसन संसर्गाचा त्रास उद्भवतो. तो लक्षात घेता राज्यातील २०२३च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये या रुग्णसंख्येमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून सामान्यांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करावे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. चीनहून आलेल्या एमएमपीव्ही अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) मुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. एचएमपीव्ही एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. खोकला, ताप, नाक चोंदणे आणि श्वास लागणे ही लक्षणे आहेत. तुमचा आरोग्य सेवा प्रदाता चाचणी करू शकतो, तथापि, कोणताही उपचार नाही.

(संदर्भ – पीटीआय)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"