राज्यात आठवडाभर पावसाचा जोर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : दक्षिण म्यानमार आणि बंगालच्या खाडीत वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागारात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून, ते महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकण्याचा आंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून या आठवड्यात म्हणजेच सोमवारपासून शनिवार (२८ सप्टेंबर) पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात आठवडाभर मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. राज्यभरात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. ऐन सुगीत पाऊस पडणार असल्यामुळे हा पाऊस मोठा नुकसानकारक ठरणार आहे. सोमवारी राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. पुणे, सांगली, कोल्हापूर परिसरात रविवारी संध्याकाळी पाऊस झाला होता.
या आठवड्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.