काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती!

विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड
दिल्ली : विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला होता. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अखेर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची काँग्रेस हायकमांडकडून घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे अधिकृत पत्र काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे. १९९९ ते २००२ या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता. २०१४ ते २०१९ या दरम्यान ते काँग्रेसचे आमदारही होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याने या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असणार आहे.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.