16 लाख 92 हजारांचे सोन्याचे दागिने आरोपींकडून हस्तगत!

गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसी परिसरात सोने आणि चांदी चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 24 तासांच्या आत चोराला जेरबंद केले आहे .पोलिसांनी आरोपींकडून 16 लाख 92 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
11 एप्रिल ला भोसरी एमआयडीसी परिसरात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्ही तपासात 38 वर्षीय गंगाधर तेलसिंगे याला मोशी येथून अटक केली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनेनंतर चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते .या आदेशानुसार युनिट एकच्या पथकाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण व घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयहिताची ओळख पटली.

पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना गंगाधर रावसाहेब तेलसिंगे (वय 38 रा. केसर ट्री टाऊन, विंग ए टू ,फ्लॅट नंबर 903) भारत माता चौकाजवळ मोशी यांच्यावर संशय बळावला. 12 एप्रिल रोजी आरोपी केएसबी चौकातील बीआरटी बस स्टॉप जवळ संशयास्पद रित्या थांबलेला दिसून आला, त्याने शर्टच्या आत काही वस्तू लपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर युनिट एकच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे ,पोलीस अंमलदार महादेव जावळे ,गणेश महाडिक ,सचिन मोरे ,प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले .त्याच्याकडून सुमारे 25 तोळे सोन्याचे व 160 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 16 लाख 92 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.