भोसरी, पिंपरी ,बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!

भोसरी, पिंपरी ,बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील भोसरी, पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दहा लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे .
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोविंद गार्डन जवळ, टॉवर शेजारी, देवकर वस्ती येथे सुमारे आठ लाख 80 हजार रुपये किमतीचा 16 किलो 120 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी बाळगल्याने दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विशाल रावण मोहिते (वय 24, यमाई नगर, साई पार्क दिघीगाव), गणेश बाबुराव थोरात (वय 24, यमाई नगर, साई पार्क, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अशोक आबासाहेब माने, पोलीस हवालदार भोसरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाट नगर येथे दोन वेगवेगळ्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली. पहिली घटना भाट नगर पिंपरी बिल्डिंग नंबर सहा येथे घडली .याबाबत विष्णू गौतम भारती पोलीस हवलदार पिंपरी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपी सनी धर्मा सिंग माचरेकर (वय 21, रा. बिल्डिंग नंबर पाच, भाट नगर, मूळ- श्रमिक नगर, दिक्षी रोड, ओझर मिग, ता. निफाड, जि. नाशिक) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याच्या ताब्यात एकूण 14,500 किमतीचा 296 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला होता.
तिसरी घटना पिंपरी भाटनगर येथील इमारत क्रमांक पाच समोरच्या मोकळ्या जागेत घडली. याबाबत गणेश बाबासाहेब करपे पोलीस हवलदार ,अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये तीन महिला आरोपी आहेत. महिला आरोपी यांनी 89 हजार 600 रुपये किमतीचा 1592 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जवळ बाळगला. या महिलेकडे सदर गांजा कोठून व कोणाकडून आणला असे विचारले असता त्यांनी अन्य दोन महिला आरोपींची नावे सांगितली.
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत साहिल प्रॉपर्टीज यांचे लेबर कॅम्प, व्हीटीपी, अर्थवन ,महाळुंगे येथे घटना घडली. दत्तात्रय उत्तम शिंदे पोलीस शिपाई, बावधन पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.मोहम्मद सरहद्दीवर खालीद (वय 32 साहिल प्रॉपर्टीज, लेबर रूम, व्ही डी पी परिसर महाळुंगे, ता. मुळशी, मूळ पत्ता- वाॅर्ड नंबर 13, अझामनगर, जि. कटियार, बिहार ) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने 61 हजार 250 रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवला संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस याबाबत तपास करत आहेत.

