राज्यात विविध ठिकाणी चार चाकी वाहने चोरणाऱी टोळी जेरबंद!

बावधन पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : राज्यातील चार चाकी वाहन चोरणाऱ्या टोळीस बावधन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून तीन अट्टल चोरांना अटक केली. ही कारवाई भूगाव रोड येथे करण्यात आली.पाच चोरीची वाहने ताब्यात घेण्यात आली. पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे विशाल गायकवाड यानी ही माहिती दिली.

31 डिसेंबर 2025 रोजी नागेश वामन शिंदे वय 46 रा. बांदल अळी, ग्रामपंचायत ऑफिस जवळ बावधन यांची( एम एच- बारा एन एक्स 87 54) ही टाटा 407 गाडी चोरी झाल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. 5 जानेवारी रोजी भुगाव रोड येथे तीन संशयित इसम चोरीची महिंद्रा पिकप बोलेरो गाडी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस हवालदार फारुख मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन त्यांचे आदेशाने सापळा लावण्यात आला. एम एच बेचाळीस 62 17 ही महिंद्रा पिकप बोलेरो गाडी भुगाव या ठिकाणी आली असता ती पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ती गाडी पोलिसांच्या ताब्यात मिळून आली नाही. 25 ते 30 किलोमीटर त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडण्यात आली.
चोरीट्या गाडीमधून धनाजी नागनाथ लोकरे (वय 35, राऊळ चौशी वस्ती, ता. माढा, जि. सोलापूर), दत्तात्रेय उर्फ सतीश सदाशिव जाधव (वय 35, रा. उरुळी देवाची, धनगर वस्ती, जिल्हा परिषद शाळे शेजारी ता. हवेली, मूळ रा. सावतामाळीनगर, पेनुर गाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अमित नागनाथ गवळी (वय 30, रा पेनुर, धांडीवस्ती, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आरोपींना अटक करण्यात आली. ही गाडी महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले. याशिवाय बावधन पोलीस ठाणे हद्दीतून टाटा 407 अल्टो कार व चाकण आणि सासवड येथून पिकप चोरी केली असे सांगितले. आरोपींकडून पुण्यातील पाच चार चाकी गाड्या ताब्यात घेऊन एकूण पाच वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले.
अटक गुन्हेगार धनाजी नागनाथ लोकरे यांच्यावर एकूण दहा वाहन चोरीचे, दत्तात्रय उर्फ सतीश सदाशिव जाधव यांच्यावर सातवाहन चोरीचे, तसेच अमित नागनाथ गवळी यांच्यावर पाच वाहन चोरीचे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल आहेत. चार चाकी वाहने चोरी करणारी टोळी पकडून बावधन पोलीस ठाणे यांनी ही कामगिरी केली आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे विशाल गायकवाड, बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलीस अंमलदार बापूसाहेब धुमाळ, फारूक मुल्ला, नितीन चंदनशिव, संजीव सावंत, मनोज राठोड, अरुण नरळे, अमोल बुरटे, बाबासाहेब पोटे, स्वप्नील साबळे, दत्ता शिंदे, अक्षय लाटे, ऋषिकेश पाटील यांचा या कारवाईत सहभाग होता.

