गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण!

तिघांना अटक, मारणेचा भाचा फरार
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील काही गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोणतेही कारण नसताना भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय 33, रा. कोथरूड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचबरोबर या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आलं होतं, तर चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा फरार आहे. या प्रकरणाबाबत पुण्याचे झोन-3 चे पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
गाडीचा धक्का लागल्यामुळे एका अज्ञात आरोपीने मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती. शिवजयंतीच्या दिवशी हा सगळा प्रकार घडला आहे. कोथरूड परिसरातील भेलके नगर आणि मयूर कॉलनी परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. या सगळ्याची माहिती मिळताच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी जाऊन त्यांनी माहिती घेऊन जखमी व्यक्तीला दवाखान्यात दाखल केले. तक्रारीवरून सुरुवातीला 324 चा गुन्हा दाखल केला होता. यानंतर मारणे टोळीचे काही व्यक्ती त्या ठिकाणी असल्याचं समोर आलं होतं, त्यातले चार आरोपी निष्पन्न केले. त्यातले तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत आणि एक आरोपी फरार आहेत, अशी माहिती देखील पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
चारही आरोपी गजानन मारणे टोळीच्या संपर्कातले आहेत. फिर्यादी आणि आरोपी यांचं काही वैर नाही. या प्रकरणात संघटित गुन्हेगारीच कलम लावण्यात आला आहे. या प्रकरणात गजा मारणेचा भाचा बाबू पवार याचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे पोलीस कोणालाही न घाबरता त्याची चौकशी करणार आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.