हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा खून!

पिंपरी : हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेल येथे घडली.
गणेश लक्ष्मण पोखरकर (वय ३४, विठ्ठलवाडी देहुगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद विश्वनाथ मोरे (वय ४५, विठ्ठलवाडी देहुगाव), गोरख विष्णू कुटे (वय ४५, दत्तवाडी आकुर्डी), संतोष आनंद मराठे (वय ३९, आकुर्डी) आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे (वय ३९, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद, गोरख आणि संतोष या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पोखरकर आणि आरोपी हे मित्र आहेत. ते तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपी विनोद मोरे याने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर याच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले. त्यानंतर गणेश पुन्हा आरोपीवर धावून गेल्यावर, इतर आरोपींनी संगनमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले. देहुरोड पोलिस तपास करत आहेत.

लष्करी अधिकारी असल्याचे भासवून व्यक्तीची फसवणूक!
चाकण : स्वतःला भारतीय लष्करातील जवान असल्याचे भासवून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची ७९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १ जुलै ते २ जुलै या कालावधीत चाकण येथील आयफेल सिटी जवळ घडली.
या प्रकरणी अजय कुमार हेमंत कुमार (वय २५, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक बजरंग पवार (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अजय यांचा विश्वास संपादन केला. अजय यांना तीन महिन्यांचे भाडे एकाच वेळी पाठवतो असे सांगून, ओरपीने अजय यांच्या युपीआय आयडीवरून सुरुवातीला काही रक्कम पाठवण्यास सांगितले. अशाप्रकारे आरोपीने फिर्यादीकडून एकूण ७९ हजार ९९७ रुपये गुगल पे च्या माध्यमातून घेऊन फसवणूक केली. चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.