कर्ज देण्याच्या बहाण्याने साडेतीन लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : बँकेतून 50 लाख रुपयांचे कर्ज मालमत्ता तारण ठेवून काढून देतो असे आश्वासन देऊन एका एका व्यक्तीची तीन लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पाच जुलै 2023 ते 25 जून 2025 या कालावधीत कमला क्रॉस बिल्डिंग पिंपरी येथील ऑफिसमध्ये घडली.

याप्रकरणी किरण भालचंद्र सूर्यवंशी (वय 48, रा. रेस्टर्न कॉलनी, सेक्टर नंबर 27 ए, घर नंबर बी दहा/47, निगडी )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश एकनाथ सूर्यवंशी (रा. ८७/२, समर्थ कृपा बिल्डिंग, फ्लॅट नंबर 104 ,काशीद पार्क, मराठा हॉटेल जवळ, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी आठ दिवसात जनविकास कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या बँकेकडून 50 लाख रुपये मालमत्ता तारण कर्ज काढून देतो असे आश्वासन देऊन कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी कडून वेळोवेळी तीन लाख 55 हजार रुपये घेतले. कोणतेही कर्ज लोन मंजूर न करता फिर्यादीने दिलेल्या रकमेपैकी फक्त 70 हजार रुपये परत करून उर्वरित दोन लाख 85 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे .25 मार्च रोजी उर्वरित रक्कम परत देतो असे सांगितले, मात्र फिर्यादीला उडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ केली. उर्वरित पैसे मागितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दलालवाड हे अधिक तपास करत आहेत.

