व्यवसायात जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५३ लाखांची फसवणूक!

पिंपरी : आळंदी येथे एका व्यक्तीने एजंट असल्याची बतावणी करून एका निवृत्त व्यक्तीची ५३ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १८ नोव्हेंबर २०१६ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत आळंदी देवाची येथे घडली.
मनोज धोंडोपंत फरकंडे (वय ३७, मरकळ रोड, पुणे) आणि बी.एम.ए. वेल्थ क्रिएटर्स लि., अल्पारी इंटरनॅशनल ट्रेडींग कंपनी, टी.पी. ग्लोबल आणि आय.एक्स. इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शामकांत एकनाथ भवरिया (वय ६८, आळंदी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून स्वतःला ‘बीएमए’ कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादीला त्यांच्या डिमॅट खात्यात गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा मिळेल असे सांगितले. फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यावरून विविध कंपन्यांचे ५३ लाख २८ हजार २७ रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मात्र, कंपनी बंद झाल्यानंतर आरोपीने गुंतवणुकीची रक्कम किंवा परतावा दिला नाही. आळंदी पोलिस तपास करत आहेत.

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी एकास अटक!
पिंपरी : एका व्यक्तीने स्वतःला ग्रामसेवक भासवून शासकीय नोकरीचे आमिष दाखवत एका व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते जून २०२४ पर्यंत भोसरी येथील अंकुशराव नाट्यसभागृह येथे घडली.
राजेश राकेश पासवान (विजय चौक, गारखेड, छत्रपती संभाजी नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात दिपक मल्लिनाथ भोसले (वय ३४, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला ग्रामसेवक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला एकूण २ लाख रुपये दिले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने भारत सरकारची राजमुद्रा असलेले खोटे नियुक्तीपत्रही दाखवले. मात्र, आरोपीने फिर्यादीला नोकरी दिली नाही आणि त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलिस तपास करत आहेत.