ट्रेडिंग ॲपमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून ५२ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ट्रेडिंग ॲपमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ ते २२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. २४) बावधन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, रितिका देवी आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला जास्त नफ्याचे आमिष दाखवत झिरोदा ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला चांगला परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ४७ लाख ३८ हजार ९३३ रुपये गुंतवण्यास भाग पाडले आणि त्यांच्या आभासी खात्यावर मोठा फायदा झाल्याचे दर्शवले.
जेव्हा फिर्यादीने ही रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना जमा रकमेवर ५ लाख रुपये कर भरण्यास भाग पाडले. कर भरल्यानंतरही त्यांची रक्कम परत न करता त्यांचे एकूण ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली. बावधन पोलिस तपास करत आहेत.

